नियोजनबद्ध विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
“दर्जेदार कामे करा, शासन नेहमी तुमच्या पाठीशी”
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :– शहरातील विकासकामांना वेग देण्यासाठी आधी सखोल नियोजन करा आणि नंतरच निधीची मागणी करा. योग्य कामांसाठी पैशांची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शहरवासीयांना दिले.
श्री गणेश महासंघ उत्सव समिती २०२५-२६ च्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी हायस्कूलजवळ पार पडले. कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार सतिष चव्हाण, विक्रम काळे, संजय केणेकर, गणेश महासंघ संस्थापक पृथ्वीराज पवार, अध्यक्ष अनिकेत निल्लावार, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले – “जनतेची कामे ही दर्जेदार असावीत. निधी योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने खर्च व्हावा. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बाधितांना पर्यायी सुविधा मिळाल्याशिवाय काम पूर्ण होऊ नये.” त्यांनी पुढे सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथे २०० कोटी रुपये खर्चून इनक्युबेशन सेंटर उभारून उद्योगांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जाईल. तसेच खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले.
यावेळी पवार यांनी गणेश महासंघाच्या वृक्षलागवड आणि नशामुक्ती अभियानांचे कौतुक करत प्रत्येक सदस्याने एक झाड लावण्याचे आवाहन केले