नगरसेवक कोट्याचा अडसर दूर! 'आप'च्या पाठपुराव्याने ६० विद्यार्थ्यांना मिळणार शाळेतील प्रवेश

नगरसेवक कोट्याचा अडसर दूर! 'आप'च्या पाठपुराव्याने ६० विद्यार्थ्यांना मिळणार शाळेतील प्रवेश

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे दि ३ जुलै :– गेल्या तीन वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नगरसेवकांच्या शिफारसीनुसार भरल्या जाणाऱ्या जागा रिकाम्या होत्या. पालिकेची निवडणूक न झाल्याने नगरसेवक पदे रिक्त होती आणि त्यामुळे शाळांमधील प्रवेश रखडले होते. मात्र, आम आदमी पार्टीचे मनोज शेट्टी व श्रद्धा शेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे आता प्रशासनाने नगरसेवक कोटा खुला करून लॉटरीतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी याबाबत आदेश जारी केले असून, सुमारे ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी इंग्रजी विद्यालय आणि येरवडा येथील मातोश्री इंग्रजी शाळेत या प्रवेशांची सुरुवात झाली आहे.

पुणे शहरात महापालिका आणि आकांक्षा फाउंडेशन संयुक्तपणे पाच शाळा चालवतात. याशिवाय आयटीच फाउंडेशनद्वारे सात शाळा चालवल्या जातात. शिक्षण हक्क कायद्यानुसार स्थानिक परिसरातील शाळेत प्रवेश मिळणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे हक्काचे आहे. त्यामुळे नगरसेवक कोट्यासारख्या अटी बेकायदेशीर आहेत, आणि या कोट्याची पद्धत रद्द करावी, अशी मागणी आपचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

शेवटी, आम आदमी पार्टीच्या सक्रिय सहभागामुळे शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीचा मार्ग मोकळा झाला आहे.