दुष्काळात विद्यार्थिनींच्या शिक्षणाला सायकलींचा आधार! सचिन अहिर यांच्या हस्ते १,००० मुलींना सायकल वाटप; अब्दुल सत्तारांचा सामाजिक उपक्रम

सिल्लोडमध्ये शिक्षणासोबत निराधारांनाही दिलासा; ५६७ लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरण

दुष्काळात विद्यार्थिनींच्या शिक्षणाला सायकलींचा आधार! सचिन अहिर यांच्या हस्ते १,००० मुलींना सायकल वाटप; अब्दुल सत्तारांचा सामाजिक उपक्रम
दुष्काळात विद्यार्थिनींच्या शिक्षणाला सायकलींचा आधार! सचिन अहिर यांच्या हस्ते १,००० मुलींना सायकल वाटप; अब्दुल सत्तारांचा सामाजिक उपक्रम

सिल्लोड दि. २२ :- दुष्काळाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या असताना विद्यार्थिनींच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, या उद्देशाने सिल्लोडमध्ये महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते तब्बल १,००० गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात तालुक्यातील ५६७ निराधार व्यक्तींना विविध शासकीय योजनांच्या लाभाची मंजुरीपत्रे देण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना बसत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांना वाहतुकीची अडचण भासू नये, या हेतूने एक हजार विद्यार्थिनींना सायकली देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या सायकलींमुळे विद्यार्थिनींचा शाळेपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होणार असून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.

याशिवाय निराधारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ५६७ पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे गरजू आणि निराधार नागरिकांनाही या उपक्रमातून दिलासा मिळाला.

सिल्लोड येथे आयोजित कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केले. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थीनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन पाठीशी आहे : सचिन अहिर

यावेळी बोलताना उपसभापती सचिन अहिर म्हणाले की, दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी संकटामुळे खचून न जाता धीर धरावा. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अडचणीच्या काळात त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विकासकामांसोबत सामाजिक बांधिलकीही जपणार : अब्दुल सत्तार

आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मनोगतात विकासकामांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले. गरजू विद्यार्थिनींचे शिक्षण सुरू राहावे आणि निराधारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकाच कार्यक्रमातून एक हजार विद्यार्थिनींच्या शिक्षणाला हातभार आणि ५६७ निराधारांना शासकीय योजनांचा आधार मिळाल्याने सिल्लोडमधील हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित