टोमण्यातून बॅनरपर्यंत! ‘भावी मुख्यमंत्री’ पोस्टरमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

टोमण्यातून बॅनरपर्यंत! ‘भावी मुख्यमंत्री’ पोस्टरमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

✍️ महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १२ :- शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्व संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील टोमणेबाजी आता थेट शहराच्या रस्त्यावर झळकणाऱ्या बॅनरपर्यंत पोहोचली असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

🗣️“मुख्यमंत्री व्हा” टोमणा ठरला चर्चेचा विषय

आजच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना उद्देशून

“चांगले काम करा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा!”

असा उपरोधिक टोमणा मारला होता.

हा वक्तव्याचा रोख राजकीय टोमणाच असल्याचे अनेकांनी मानले, मात्र त्यानंतर घडलेल्या घटनेने या प्रकरणाला वेगळेच वळण दिले.

🎯क्रांती चौकात झळकले ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर

या वक्तव्यानंतर राजेंद्र जंजाळ यांच्या एका कार्यकर्त्याने शहरातील क्रांती चौक परिसरात

“भविष्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री”

असा उल्लेख असलेले मोठे बॅनर लावले.

हे बॅनर पाहताच शहरात चर्चेचा जोर वाढला असून अनेकांनी याला थेट शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाचा भाग मानले आहे.

⚡शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड

या घटनेमुळे शिवसेनेतील दोन गटांतील सुप्त संघर्ष पुन्हा समोर आला आहे. एका टोमण्याला उत्तर म्हणून बॅनर लावण्यात आल्याने पक्षातील समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वावरून सुरू असलेली कुरघोडी स्पष्टपणे दिसून येत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, अशा प्रकारच्या घडामोडी पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात.

🔍आगामी राजकारणात मोठे संकेत?

या प्रकरणामुळे शिवसेनेत नेतृत्वाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे पालकमंत्री शिरसाट यांचे वक्तव्य आणि दुसरीकडे जंजाळ समर्थकांची प्रतिक्रिया, यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

✨जनतेच्या नजरा आता पुढील राजकीय हालचालींकडे…

राजकारणात टोमणे अनेकदा दुर्लक्षित होतात, पण यावेळी त्या टोमण्याचे बॅनरमध्ये रूपांतर झाल्याने शिवसेनेतील वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे.