जामनेरमध्ये मुस्लीम तरुणाची मॉब लिंचिंग; आमदार अबु आझमींची पीडित कुटुंबीयांशी भेट
"‘हेट स्पीच थांबवा, नाहीतर हेट क्राईम थांबणार नाही’ – आमदार अबु आझमी"
महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव दि १८ :- जामनेर तालुक्यात दुसऱ्या धर्माच्या मुलीशी बोलल्याच्या कारणावरून काही कट्टरपंथी तरुणांनी सुलैमान नावाच्या मुस्लीम तरुणाला कुटुंबीयांसमोरच बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आझमी यांनी सोमवारी जामनेर येथे भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी वडिलांच्या डोळ्यातील दुःख आणि आईच्या सिसकाऱ्यांतून व्यक्त होणारी वेदना पाहून कुटुंबाचा दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.
आझमी यांनी यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाशीही चर्चा केली. कुटुंबीयांनी दिलेल्या दोन मुख्य आरोपींच्या नावांवर तातडीने कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. "मृत मुलगा परत आणता येणार नाही, पण कुटुंबासाठी न्याय मिळवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे," असे ते म्हणाले.
👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार आझमींची मागणी
पीडित सुलैमानच्या कुटुंबाला किमान २५ लाख रुपये मदत द्यावी
कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी
दोषींवर कठोर कारवाई करून कोणताही आरोपी सुटू नये
तसेच राज्यात सतत होत असलेल्या द्वेषमूलक प्रचारावर त्यांनी संताप व्यक्त केला. "सत्ता मिळवण्यासाठी पसरवली जाणारी नफरत थेट हेट क्राईमपर्यंत पोहोचत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नफरतविरोधी कायदा करावा आणि त्यांच्या मंत्र्यांनी मुस्लिमांविरोधात विष पसरवण्यावर बंदी आणावी," अशी मागणी आझमींनी केली.
त्यांनी स्पष्ट केले की, "ज्यादिवशी हेट स्पीच थांबेल, त्यादिवशी हेट क्राईमही थांबेल. राज्याला आत्ताच नफरतविरोधी कायद्याची सर्वाधिक गरज आहे."
✅ महाराष्ट्रवाणीच्या बातम्या मिळवा सर्वप्रथम – कारण सत्य दडपता येत नाही!