जामनेरमधील सुलेमान पठाण प्रकरण! प्रकाश आंबेडकरांची पीडित कुटुंबियांच्या घरी भेट; न्यायासाठी ठाम मागणी
महाराष्ट्र वाणी न्युज
जामनेर,जळगाव दि ३० :- काही दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील बेटावद गावातील तरुण सुलेमान पठाण (वय २१) याची काही समाजकंटकांनी जमावाने निर्दय हत्या केली होती. या अमानुष घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुलेमान पठाण यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी मृत सुलेमानच्या नातेवाईकांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी “आमच्या मुलाला न्याय मिळावा” अशी मागणी केली.
आंबेडकर यांनी कुटुंबियांचे सांत्वन करताना प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा करावी, असा ठाम आवाज उठवला. त्यांनी सरकारकडे समाजात भीतीचे सावट नको म्हणून या प्रकरणाची जलदगतीने चौकशी करण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी आमदार नातिकोउद्दीन खतीब, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी सुलेमान पठाण प्रकरणी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
जामनेर तालुक्यातील या घटनेने जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
👉 “सुलेमान पठाणला न्याय मिळाला नाही, तर हा लढा रस्त्यावरही उभा राहील!” – नागरिकांचा इशारा