जातीय तेढ प्रकरणात अल्पसंख्याक आयोगाचा दणका! आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाईचे आदेश – ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

महाराष्ट्र वाणी न्युज
नगर दि २८ जून :- नगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांत मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजाविरोधात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्ये व कृती झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे.
नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आणि न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही जातीवादी संघटनेसह जवखेड खालसा येथील दर्ग्यात घुसून विटंबना केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विकास मंडळाचे शोएब खाटीक आणि समस्त मुस्लिम जमात ट्रस्टचे डॉ. परवेज अशरफी यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत आयोगाचे सदस्य वसीम बुरहान यांनी नगर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ७ दिवसांत चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा राज्य अल्पसंख्यांक आयोग कायदा २०१२, कलम १०(क) अंतर्गत आयोग स्वतः सुनावणी घेऊन संबंधितांना हजर राहण्याचे आदेश जारी करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
धर्माच्या नावावर द्वेष नाही – न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!