ग्राहकाने स्वतः जागरूक होऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ग्राहकाने स्वतः जागरूक होऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
ग्राहकाने स्वतः जागरूक होऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १८ :- बाजारपेठेत मिळणाऱ्या विविध वस्तू, उत्पादने याची गुणवत्ता ,किंमत आणि दर्जेदारपणा याबाबतच्या नोंदी पाहूनच ग्राहकाने वस्तूंची आणि उत्पादनाची खरेदी करावी . ग्राहक म्हणून आपण आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जागरूक रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी , अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील, वजने व मापे विभागाचे शिवाजी मुंडे, पोलीस प्रशासन परिवहन, आरोग्य विभाग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 ग्राहकानी विविध उत्पादन खरेदी करून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने स्वतः उत्पादन किंवा वस्तू याबाबतची खातरजमा करणे आवश्यक आहे .त्याचबरोबर झालेल्या फसवणुकीबाबत ग्राहक न्यायालयात दाद मागणे ही महत्त्वाचे आहे .जागरूक राहून स्वतःच्या हक्काचे संरक्षण करणे तसेच इतरांनाही होणाऱ्या फसवणुकीपासून परावृत्तकरणे आवश्यक आहे.विविध भेसळ आणि निकृष्ट वस्तू मुळे ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे .विविध आजारांनाही खाद्यपदार्थां मधील भेसळेतून निमंत्रण दिले जात आहे .यासाठी ग्राहक आणि जागरूक होऊन आरोग्य आणि आपल्या हक्क, कर्तव्याबाबतही जागृत रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले .

 

कार्यक्रमात डॉ. मिलिंद जोशी यांनी आयुष्यमान भारत योजनेसाठी आयुष्यमान योजनेचे कार्ड आवश्यक असल्याचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये प्रत्येक कुटुंब पाच लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण व उपचाराचा खर्च मिळतो .तसेच वय वंदन योजनेअंतर्गत वयाच्या ७० वर्षानंतर आरोग्य व उपचार सुविधा या योजनेअंतर्गत मिळतात. यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन यांनी कार्यक्रमात केले. 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांनी अन्न औषध सुरक्षा मानके व कायदा, भेसळ विरहित अन्नाचे प्रकार ओळखण्याचे उपाय सांगितले. गुणवत्तापूर्ण, चविष्ट आणि आरोग्यदायी अन्न मिळणे हा सर्वांचा हक्क असून तो जागरूकतेने मिळवण्यासाठी प्रत्येकाने सदैव जागृत राहिले पाहिजे . भेसळ किंवा अन्नपदार्थांच्या तक्रारीबाबत१८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले . फूड सेफ्टी या अँप वर ज्या अन्नपदार्थाची चव, गुणवत्ता, भेसळ असेल अशा पदार्थांविषयी तक्रार नोंदण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहे त्याचा उपयोग आपल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी करावा असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. विभागाअंतर्गत पनीर, दूध, ,चहा पावडर ,हळद, मिरची पावडर या महत्वपूर्ण आणि दैनंदिन वापरात असलेल्या पदार्थांमध्ये भेसळ आहे हे कशी ओळखायची याबाबतचे प्रात्यक्षिके या कार्यक्रमात दाखवण्यात आले. उपनियंत्रक, वैद्यमापन यंत्र वजने विभागाचे शिवाजी मुंडे यांनी वस्तू व उत्पादनाच्या वजनाबाबत शंका असल्यास तक्रार दाखल करण्यासाठी मार्गदर्शन केले .

 रस्ता सुरक्षा अंतर्गत ,परिवहन विभागाने अपघात होऊ नये यासाठी नियमाचे पालन, अपघात झालेला असल्यास वैद्यकीय मदत.व इतर मदत मिळावी यासाठी अपघात निवारण कक्ष कसा उपयोगी पडतो याची माहिती दिली.

ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्यांची या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थिती होती. यामध्ये राजेश मेहता, संगीता धारूरकर, धनंजय मुळे, नानक वेदी, अशोक ठोंबरे,शेख अनवर शेख कौसर यांच्यासह इतर सदस्य आणि रास्त धान्य दुकानदार या कार्यक्रमात उपस्थित होते.