गुंठेवारीत ५०% सूट द्या, २०२४ पूर्वीची बांधकामे नियमित करा – स्थापत्य अभियंते व वास्तुविशारदांचे महापौरांना निवेदन

गुंठेवारीत ५०% सूट द्या, २०२४ पूर्वीची बांधकामे नियमित करा – स्थापत्य अभियंते व वास्तुविशारदांचे महापौरांना निवेदन
गुंठेवारीत ५०% सूट द्या, २०२४ पूर्वीची बांधकामे नियमित करा – स्थापत्य अभियंते व वास्तुविशारदांचे महापौरांना निवेदन

✍️ महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- महानगरपालिका गुंठेवारी पॅनेलवरील व्यावसायिक स्थापत्य अभियंता व वास्तुविशारद कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या निवेदनात नवीन विकास आराखडा (EP Plan) तातडीने मंजूर करून शहरातील गुंठेवारी भागांचा नियोजनबद्ध विकास साधावा तसेच महानगरपालिकेच्या महसुलात वाढ करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळाने “३१ डिसेंबर २०२४” पूर्वीची बांधकामे गुंठेवारी अंतर्गत नियमित करण्यासाठी ठराव घेण्याची मागणी केली. तसेच विद्यमान दर व बेटरमेंट शुल्क कमी करून एकूण चलनावर ५०% सूट द्यावी, खुल्या भूखंडांसाठी ५०% बेटरमेंट योजना जाहीर करावी, आणि सातारा–देवळाई परिसरातील सूट योजना संपूर्ण शहरात लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली.

प्रशासकीय सुधारणा म्हणून गुंठेवारी कक्षासाठी स्वतंत्र उपअभियंता/कनिष्ठ अभियंता नेमावा, १५ दिवसांची वेळमर्यादा निश्चित करावी, प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करावी, किचकट अटी कमी कराव्यात तसेच नियमित मासिक बैठकीत अडचणी सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून नम्र वर्तन करावे व शिस्त राखावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने मांडली.

सदर निवेदनावर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, प्रस्तावित सर्वसाधारण सभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी मनपा आयुक्त, उपमहापौर व सर्व नगरसेवकांना देखील निवेदन देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळात कृती समितीचे समन्वयक इंजि. विशाल बन्सवाल, अर्कि. सुधीर कुलकर्णी, इंजि. सचिन दुबे, इंजि. अब्दुल कुड्डस यांच्यासह मोठ्या संख्येने व्यावसायिक स्थापत्य अभियंते व वास्तुविशारद उपस्थित होते.

गुंठेवारीसंदर्भातील या मागण्यांवर महापालिका काय निर्णय घेते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.