गायरान अतिक्रमण आदेशाच्या विरोधात वंचित आघाडीचा जोरदार विरोध; जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची केली होळी!

गायरान अतिक्रमण आदेशाच्या विरोधात वंचित आघाडीचा जोरदार विरोध; जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची केली होळी!
गायरान अतिक्रमण आदेशाच्या विरोधात वंचित आघाडीचा जोरदार विरोध; जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची केली होळी!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ जुलै :- जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाला वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शवला. आज विभागीय उपायुक्तांची भेट घेऊन निषेध नोंदवताना, आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची होळी करत आपला संताप व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील गायरान जमिनींवर सरकारनेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी योजना अंतर्गत गरजू नागरिकांना घरे बांधण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश म्हणजे गरीबांना बेघर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आघाडीने विचारले आहे की, "पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने जिल्हाधिकारी हे भूमिहीनांना बेघर करण्यासाठीच हे आदेश काढत आहेत का?" तसेच हे आदेश गरीब जनतेच्या विरोधात असून, प्रशासन जनतेला न्याय देण्याऐवजी आंदोलनात ढकलत असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी आघाडीने आरोप केला की, जिल्ह्याच्या गायरान जमिनी लाटण्यासाठीच हे आदेश काढण्यात आले आहेत. अतिक्रमणधारकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर केले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीही विविध पातळ्यांवर आंदोलने करून, गायरान जमिनी अतिक्रमणधारकांच्या नावे करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे विधानसभेवर मोर्चाही काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी गायरान अतिक्रमण नियमबद्ध करण्याचे आश्वासन दिल्याची आठवण देखील या वेळी करून देण्यात आली.

जर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे घेतले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

या आंदोलनात योगेश बन (जिल्हाध्यक्ष), सतीश गायकवाड (युवा जिल्हाध्यक्ष), संदीप जाधव (शहराध्यक्ष मध्य), रुपचंद गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष), सतीश शिंदे (युवा जिल्हा महासचिव), भगवान खिल्लारे (मध्य शहर महासचिव), मिलिंद बोर्डे (जिल्हा महासचिव), भाऊराव गवई (प्रसिद्धी प्रमुख), नितीन भुईगळ, कोमल हिवाळे (महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव), गणेश खोतकर (सम्पर्क प्रमुख), सुभाष कांबळे (जिल्हा सचिव), प्रवीण जाधव, शेख युनुस पटेल (गंगापूर तालुकाध्यक्ष), भय्यासाहेब जाधव, रवी रत्नपारखे, एस पी मगरे, राजाराम घुसाळे (खुलताबाद तालुका महासचिव), प्रभाकर घाटे, विजय घाटे, योगेश घाटे, सुधाकर घाटे आदींसह मोठ्या संखेने उपस्थित होते .

✍️ अधिक बातम्यांसाठी जोडलेले रहा... महाराष्ट्र वाणी.com ला