कचरावेचक अंजू माने यांनी दहा लाखांनी भरलेली बॅग मालकाला केली परत!पुण्यात स्वच्छतेसोबत मानवतेचीही सेवा!
महाराष्ट्र वाणी
पुणे दि २२:- सकाळचा नेहमीसारखाच दिवस… पण २० नोव्हेंबरच्या त्या सकाळी सदाशिव पेठेत एक प्रसंग घडला ज्याने संपूर्ण पुणेकरांच्या मनात कचरावेचक अंजू माने यांच्याविषयी अपार आदर निर्माण केला.
२० वर्षांपासून ‘स्वच्छ’ संस्थेत कचरा वेचण्याचे काम करत असलेल्या अंजू माने रोजप्रमाणे सकाळी ७ वाजता दारोदार कचरा गोळा करत होत्या. दरम्यान, ८ ते ९ च्या सुमारास फीडर पॉईंटजवळ त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. अनुभवाने शहाणी झालेल्या अंजू ताईंना वाटलं—कदाचित कोणाची औषधांची बॅग असेल. म्हणून त्यांनी ती बॅग उचलून सुरक्षित जागी ठेवली.
परंतु बॅग उघडताच त्यांच्या नजरेत औषधांसोबत दहा लाखांची रोख रक्कम चमकली!
याच क्षणी प्रामाणिकपणाचा खरा कस लागतो…
आणि अंजू ताई त्या कसोटीवर नेहमीप्रमाणे अढळ उभ्या राहिल्या.
त्यांनी लगेच परिसरातील नागरिकांना विचारपूस सुरू केली. ज्यांच्यावर त्यांनी २० वर्षे विश्वासाचा पूल बांधला—त्याच लोकांच्या मदतीने त्या बॅगेचा मालक शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले.
दरम्यान, एक नागरिक (ज्यांची ओळख त्यांच्या विनंतीनुसार गुप्त ठेवण्यात आली आहे) अत्यंत अस्वस्थपणे काहीतरी हरवल्याचा शोध घेत असल्याचे अंजू ताईंनी पाहिले. त्यांनी त्या नागरिकाला थांबवले, आधी पाणी देऊन शांत केले आणि मग विचारपूस केली.
थोड्या तपशीलवार चौकशीअंती निश्चित झाले—
ती बॅग त्यांचीच होती!
आणि अंजू ताईंनी दहा लाख रुपये जशीच्या तशी परत केली!
या प्रामाणिकपणाने भारावलेल्या त्या नागरिकांनी अंजू माने यांचा साडी आणि रोख रक्कम देऊन सत्कार केला. परिसरातील रहिवाशांनीही टाळ्यांच्या आवाजात अंजू ताईंचा गौरव केला.
अंजू माने यांनी पुन्हा सिद्ध केले—
‘स्वच्छ’चा मॉडेल म्हणजे फक्त कचरा व्यवस्थापन नाही…
तर नागरिक आणि कचरावेचक यांच्यातील विश्वासाचं जिवंत नातं आहे.
४० लाख पुणेकरांचे दैनंदिन कचरा संकलन सांभाळणारे ४००० स्वच्छ कर्मचारी रोज जेव्हा घराघरात जातात तेव्हा फक्त कचरा नेत नाहीत…
ते विश्वास घेऊन येतात आणि तोच विश्वास परतही देतात.
अंजू ताईंनी दाखवलेली ही प्रामाणिकतेची उज्ज्वल कहाणी पुण्याचा मान आणखी उंचावणारी आहे.