ओबीसींसाठी १५ लाखांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध!ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध – मंत्री अतुल सावे
महाराष्ट्र वाणी न्युज
नागपूर दि २० :- ओबीसी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती सरकार ठामपणे काम करत असून या समाजाच्या पाठीशी सरकार नेहमीच सक्षमपणे उभे राहील, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाज्योती संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दर्जेदार प्रशिक्षण देण्यात आले आहे, यामुळे अनेक तरुण अधिकाऱ्यांनी शासन व्यवस्थेत सन्मानाने स्थान मिळवले आहे, असे सावे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाच्या विकासाच्या संधींना नवे दिशा मिळाल्याचे ते म्हणाले. नागपूर येथे महाज्योतीच्या भव्य इमारतींचे भूमिपूजन स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. “ओबीसी समाजाच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार देण्याची महत्त्वाची पायरी आज उभी करण्यात आली आहे,” असे सावे यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी ओबीसी समाजातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या १५ लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्ज योजना आणि उद्योग प्रशिक्षण सुविधांची माहिती दिली. “स्वावलंबनाकडे मार्गक्रमण करण्यासाठी ही योजना मोलाची संधी आहे. स्वतःचा उद्योग सुरू करण्यापासून व्यवसाय विस्तारापर्यंत प्रत्येक तरुणाला मदत मिळत आहे,” असे सावे म्हणाले.
ओबीसी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने निर्णय घेतल्याबद्दल मंत्री सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
ओबीसी समाजाच्या प्रगतीची नवी सुरुवात – विकासाच्या नव्या संधी, आत्मनिर्भरतेकडे पाऊल.