"एसटीमध्ये १७,४५० चालक व सहायकांची मेगाभरती; तरुणांना रोजगार आणि ३० हजारांचा पगार!"
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २१ :- MSRTC Bharti 2025 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच तब्बल ८ हजार नवी बसगाड्या दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवासीसेवा सक्षम ठेवण्यासाठी एसटी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर चालक व सहायक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या भरतीत एकूण १७,४५० पदांचा समावेश असून, निवड प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून ई-निविदा पद्धतीने सुरू होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल, तसेच त्यांना ३० हजार रुपयांपर्यंत मासिक मानधन मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ही भरती प्रक्रिया राज्यातील सहा प्रादेशिक विभागांमार्फत पार पाडली जाणार असून, आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी अधिकृत संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.
सध्या एसटीकडे १५,७७४ बस आहेत, त्यात १४,९९३ स्वतःच्या व ७८१ भाडेतत्त्वावर चालणाऱ्या गाड्या आहेत. २०१५-१६ मध्ये एसटीमध्ये १ लाख ८ हजार कर्मचारी होते; मात्र आता ती संख्या घटून ८७ हजारांवर आली आहे. येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निवृत्ती अपेक्षित असल्याने ही मेगाभरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ही संधी राज्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराचं नवं दार ठरणार असून, प्रवाशांना अधिक अखंडित व सुरक्षित सेवा देण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.