एक योजना गाजवली, दुसरी गमावली! ‘लाडकी बहीण’मुळे ‘शिधा’ गायब

'आनंदाचा शिधा' यंदा थांबणार – छगन भुजबळ यांची कबुली"

एक योजना गाजवली, दुसरी गमावली! ‘लाडकी बहीण’मुळे ‘शिधा’ गायब

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ७ :- मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसह अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीमुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय नियोजनावर मोठा ताण आला असल्याची कबुली अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली.

या आर्थिक ताणामुळे 'आनंदाचा शिधा' ही लोकाभिमुख योजना यंदा राबवता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'लाडकी बहीण' योजनेसाठी दरवर्षी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यामुळे इतर खात्यांच्या आर्थिक तरतुदींवर परिणाम होणे अपरिहार्य असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना मदत करणेही सरकारवर बंधनकारक आहे. या सर्व खर्चामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह अनेक खात्यांचे अर्थनियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 'आनंदाचा शिधा' योजना सध्या थांबवावी लागणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.

सरकारच्या एकूण आर्थिक स्थितीवर सध्या चर्चा सुरू असून, सार्वजनिक बांधकाम खात्यात ठेकेदारांची बिले रखडल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, 'लाडकी बहीण' योजनेमुळे राज्याच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाल्याचे स्पष्टपणे मान्य करणारे भुजबळ हे महायुती सरकारमधील पहिलेच मंत्री ठरले आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती.

योजना पुढे कशी राबवणार?

२०२२ साली सुरू झालेल्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ सुमारे दोन कोटी नागरिकांना झाला होता. ही योजना राबवण्यासाठी वार्षिक ५०० कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे. तसेच 'शिवभोजन थाळी' योजनेसाठी वर्षाला १४० कोटींची गरज असताना, अन्न व नागरी पुरवठा विभागाला केवळ ७० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर योजना कशी सुरू ठेवायची, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.