“उर्दू फलक काढल्याने संताप उसळला! SDPI चे रेल्वे स्थानकावर धडक आंदोलन – पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले”

“उर्दू फलक काढल्याने संताप उसळला! SDPI चे रेल्वे स्थानकावर धडक आंदोलन – पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले”

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ :- शहराच्या नामांतरानंतर रेल्वे स्थानकालाही नवे नाव देत मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये फलक बसवण्यात आला होता. मात्र भाजपाकडून आलेल्या वक्तव्यानंतर प्रशासनाने उर्दू फलक हटवल्याने SDPI (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) संतप्त झाली. दहा दिवसांचा अवधी देऊनही उर्दू फलक परत न लावताच, आज दुपारी एक वाजता SDPI ने जोरदार ‘रेल्वेरोको’ आंदोलन छेडले.

जिल्हाध्यक्ष समीर शहा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते झेंडे आणि बॅनर घेऊन रेल्वे स्थानकात दाखल झाले. “उर्दू के सन्मान में एसडिपिआय मैदान में”, “भाजपा होश में आओ”, “उर्दू में बोर्ड लगाया जाये” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलक रेल्वेप्रवेशद्वारात पोहोचताच पोलिसांनी त्यांना थोपवून ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात किरकोळ झटापटही झाली. महिला कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेऊन वेदांतनगर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाईनंतर सोडण्यात आले.

माध्यमांशी बोलताना समीर शहा म्हणाले, “उर्दू भाषा संपवण्याचा भाजपाचा डाव आम्ही कधीच सफल होऊ देणार नाही. स्वातंत्र्यलढ्यात उर्दू भाषेतून क्रांती पेटली होती. लाखो मुस्लिमांनी प्राणांची आहुती दिली. उर्दू ही केवळ मुस्लिमांची नाही; ती हिंदुस्तानी भाषा आहे.”

पुढे ते म्हणाले, “शहराचे नामांतर झाले म्हणून रेल्वेने उर्दू फलक काढणे चुकीचे आहे. रेल्वेवर राज्य सरकारचा जीआर लागू होत नाही. 2017 च्या रेल्वे कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ज्या भागात विशिष्ट भाषिकांचे प्रमाण अधिक आहे, तिथे त्या भाषेतील नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठवाड्यातील इतर आठ जिल्ह्यांतही उर्दू फलक आहेत, मग फक्त इथलाच का हटवण्यात आला?”

“उर्दू फलक परत लावला नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा शहा यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष समीर शहा, अब्दुल अलीम, मोहसीन खान, आरेफ शाह, अश्रफ पठाण, जबीन शेख, अबुजर पटेल, रियाज सौदागर, हसीन कौसर, हाफिज समीउल्लाह काजी, फरहान शेख, सोहेल पठाण, सरफराज खान, मोहसीन शेख, मिर्झा शमीम यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.