“आरक्षण गेलं… आता मौलानांनी रस्त्यावर उतरावं!” – इम्तियाज जलील यांचा थेट हल्लाबोल

“आरक्षण गेलं… आता मौलानांनी रस्त्यावर उतरावं!” – इम्तियाज जलील यांचा थेट हल्लाबोल

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- राज्यात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के ‘एसबीसी’ आरक्षण तसेच त्यासंदर्भातील शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाने मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली असतानाच, माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी समाजातील काही मौलानांवर जोरदार टीका केली आहे.

जलील म्हणाले की, जे मौलाना फक्त निवडणुका आल्या की सक्रिय होतात, त्यांनी आता समाजावर संकट आले असताना पुढे येऊन नेतृत्व करावे. “पाच वर्षातून एकदाच बाहेर पडायचं का? आता आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, मग तुमची भूमिका काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“म्हणूनच बीडमध्ये पराभव झाला”

बीडमधील राजकीय उदाहरण देत जलील म्हणाले की, काही मौलानांनी एकत्र येऊन अजित पवार यांना पाठिंबा दिला आणि समाजाकडून मतदान करून घेतले. त्यामुळे तिथे आमचा पराभव झाला.

“आता माझी अपेक्षा आहे की, हेच मौलाना आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व करतील. मी त्यांच्या मागे चालायला तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“निवडणुकीत दुकानं उघडू नका”

जलील यांनी संतप्त शब्दांत सांगितले की, आम्ही पाच वर्षे आंदोलन करतो आणि निवडणूक आली की काही लोक फक्त मत मागायला येतात.

“हे आता थांबलं पाहिजे. समाजाला आरक्षणाची गरज आहे, तेव्हा पुढे या,” असे त्यांनी आवाहन केले.

आर्थिक निकषावर आरक्षणाचे समर्थन

इम्तियाज जलील यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, आरक्षणाचा विचार फक्त धर्मावर नाही तर गरिबी आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित असावा.

“ब्राह्मण समाजातही गरीब विद्यार्थी आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. गरिबांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

आरक्षणाचा लढा आता समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला असून पुढील आंदोलनाची दिशा लवकरच स्पष्ट होणार आहे.