“आता आम्ही मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना नोटीस देणार"- विनोद पाटील
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद)दि २० :- हर्सूल भागातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात अखेर न्यायालयानं महापालिकेच्या मनमानीला लगाम लावला आहे. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) ती जागा अधिकृतरीत्या अधिग्रहित करून त्याचा मोबदला देखील दिला होता. तरीसुद्धा मनपा अधिकाऱ्यांनी अट्टाहासाने घरं पाडण्याची कारवाई केली. या दादागिरीविरोधात सातत्याने आवाज उठवणारे विनोद पाटील यांनी आज तीव्र प्रतिक्रिया दिली.
“दहशतीनं, दादागिरीनं लोकांचा हक्क हिरावून घेता येत नाही हे न्यायालयानं दाखवून दिलं आहे. मनपाला त्या जागेवर कुठलाही अधिकार नव्हता, तरीही पाडापाडी केली. न्यायालयाने मनपाच्या मनमानीला चपराक दिली आहे,” असं पाटील म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं, “आता आम्ही मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांना नोटीस देणार आहोत. नागरिकांची घरं तोडताना कोणत्या कायदेशीर अधिकाराचा आधार घेतला, याचं उत्तर द्यावं लागेल. सर्वसामान्यांना त्रास देऊन, दहशत निर्माण करून घरं पाडणं आम्ही खपवून घेणार नाही.”
पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत, छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला आश्वासन दिलं की, “या शहरातील प्रत्येक पिडीताला न्याय मिळेपर्यंत, प्रत्येकाला आर्थिक मोबदला मिळेपर्यंत मी ताकदीनं तुमच्या सोबत उभा राहणार आहे. न्यायपालिकेवर आपला पूर्ण विश्वास आहे, पण मनपा प्रशासनाने आता तरी लोकांच्या वेदना ऐकल्या पाहिजेत.”
या प्रकरणामुळे शहरात मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.