"आंदोलकांना पाणी न देणारे सरकार जनतेचे कसे? – पँथर सेनेचा सवाल!"
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ३० :- आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेनेने आज ठाम पाठिंबा दिला. पँथर सेनेचे नेते दिपक केदार यांनी आंदोलनस्थळी भेट देत मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
केदार यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत म्हटले की, “गरीब मराठा बांधवांना सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी. आंदोलकांना पाणी, सुविधा नाकारून सरकार कोणता संदेश देत आहे? जनतेचे सरकार असे वागत असेल तर ते जनतेचे कसे?”
त्यांनी पुढे सांगितले की, “अनेक आंदोलकांनी मला सांगितले की, पाण्याचीही व्यवस्था होत नाही. उपोषणकर्त्यांना किमान पाणी उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. हे न करणे अमानवी आहे.”
पँथर सेनेच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, आंदोलनकर्त्यांचा कोंडमारा हा मानवी हक्कांचा भंग आहे आणि सरकारने त्वरित हस्तक्षेप करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा पँथर सेना रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीला सातत्याने विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांकडून समर्थन मिळत असून, राज्य सरकारवर तोडगा काढण्याचा दबाव वाढत चालला आहे.
✍️ महाराष्ट्रवाणी