आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवेचा पालकमंत्र्याकडून गौरव

आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवेचा पालकमंत्र्याकडून गौरव
आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवेचा पालकमंत्र्याकडून गौरव

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- ग्रामीण पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मान उंचावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. अमेरिकेतील बिरमिंघम, अलाबामा (USA) येथे 26 जून ते 7 जुलै 2025 दरम्यान पार पडलेल्या 21 व्या वर्ल्ड पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्स या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्यांनी पॉवर लिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदक आणि बेंच प्रेस प्रकारात कांस्यपदक जिंकले.

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. संजयजी सिरसाठ, पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री यांनी त्यांचा विशेष सत्कार करून हार्दिक शुभेच्छा दिल्या. साळवे यांच्या या कामगिरीमुळे केवळ पोलीस दलाचंच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारताचं नाव जागतिक पातळीवर उजळलं आहे.

या स्पर्धेत 90 पेक्षा जास्त देशांतील पोलीस व अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. कौशल्य, फिटनेस आणि शौर्य यांचे प्रतीक असलेल्या या स्पर्धेत साळवे यांची कामगिरी विशेष ठरली. सध्या वैजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या साळवे यांनी याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये कोलंबिया, दक्षिण अमेरिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.

या प्रसंगी मा. जितेंद्र पापळकर (विभागीय आयुक्त), मा. वीरेंद्र मिश्रा (विशेष पोलीस महानिरीक्षक), मा. दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी), मा. डॉ. विनयकुमार राठोड (पोलीस अधीक्षक) आणि मा. अन्नपूर्णा सिंग (अपर पोलीस अधीक्षक) यांनीही त्यांचे कौतुक करत हार्दिक शुभेच्छा दिल्या.

— महाराष्ट्र वाणी

"शौर्य, कर्तृत्व आणि देशभक्तीला आमचा सलाम!"