सिल्लोड तहसील कार्यालयात ‘लाचखोरी’चा स्फोट! नायब तहसीलदारासह सेतू चालक जाळ्यात

सिल्लोड तहसील कार्यालयात ‘लाचखोरी’चा स्फोट! नायब तहसीलदारासह सेतू चालक जाळ्यात

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि ६ :- सिल्लोड तहसील कार्यालयात मोठी लाचखोरी उघडकीस आली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडक सापळा कारवाईत नायब तहसीलदार हारून अजिज शेख आणि सेतू सुविधा केंद्र चालक युवराज तायडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय तक्रारदार आपल्या ट्रॅक्टरद्वारे वैध परवान्यासह गौण खनिज वाहतूक करत होते. मात्र, 4 एप्रिल रोजी नायब तहसीलदार हारून शेख यांनी त्यांचा ट्रॅक्टर पकडून ‘जास्त वाळू वाहतूक’ केल्याचा आरोप करत कारवाईची धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी आणि पुढेही वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल 25 हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट ACB कडे धाव घेतली. 6 एप्रिल रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, आरोपीने तडजोडीअंती 15 हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवली आणि त्यापैकी 10 हजार रुपये सेतू चालक युवराज तायडे याच्याकडे देण्याचे सांगितले.

यानंतर ACB पथकाने सापळा रचताच, तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना युवराज तायडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयातून नायब तहसीलदार हारून शेख यांनाही ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून मोबाईल फोन व लाच रक्कम जप्त करण्यात आली असून घरझडती प्रक्रिया सुरू आहे. दोघांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी योगेश शिंदे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

👉 नागरिकांसाठी आवाहन:

कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्याच्या वतीने कोणीही व्यक्ती कामासाठी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करा —

📞 टोल फ्री: 1064

📱 व्हॉट्सॲप: 7720891064

✍️ “लाचखोरीला ‘नो’ म्हणा... एक फोन तुमचा, कारवाई आमची!”