15व्या वर्षी ‘हाफिज’ ते JEE Main मध्ये 99.93% – सय्यद जैद सादिकचा नाशिकमध्ये अव्वल झेंडा!

15व्या वर्षी ‘हाफिज’ ते JEE Main मध्ये 99.93% – सय्यद जैद सादिकचा नाशिकमध्ये अव्वल झेंडा!

महाराष्ट्र वाणी

नाशिक (वा.) दि २३ :- वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कुराण तोंडपाठ करून ‘हाफिज’ ही मानाची पदवी मिळवणाऱ्या सय्यद जैद सादिक या होतकरू विद्यार्थ्याने आता शैक्षणिक क्षेत्रातही तुफान कामगिरी करत JEE Main 2026 (Session 2) परीक्षेत तब्बल 99.93 टक्के गुण मिळवून नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नाशिकच्या अशोका विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या जैदने आपल्या कष्ट, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत चमकदार यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण नाशिक शहराचा मान उंचावला आहे.

या दैदिप्यमान यशामागे त्याचे वडील सय्यद सादिक आणि आई सय्यद जौकिया यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, तसेच विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे जैदने सांगितले. याशिवाय निवृत्त प्राध्यापक सय्यद अल्ताफ आणि सय्यद सुलताना यांनी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यात मोठी भूमिका बजावली.

विद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि शिक्षकांनी “हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे” अशी भावना व्यक्त करत जैदच्या यशाचे कौतुक केले.

दरम्यान, सय्यद जैद सादिकच्या या उल्लेखनीय कामगिरीवर नाशिककरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.

👉 “मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतेही यश अशक्य नाही,” हे सय्यद जैद सादिकने आपल्या यशातून दाखवून दिले आहे!