अल्पसंख्याक बहुल भागातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्या — काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची मागणी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १ :- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधित्वाचा मुद्दा अग्रक्रमाने मांडला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारी निश्चित करावी, अशी मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाकडून करण्यात आली आहे.
या मागणीनुसार, तालुक्यातून किमान एक जिल्हा परिषद सदस्यपदाची उमेदवारी अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्याला देण्यात यावी, तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात काही पंचायत समिती मतदारसंघांमध्येही अल्पसंख्याक समाजातील पात्र उमेदवारांना संधी देण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत अल्पसंख्याक बहुल प्रभागांमध्ये मुस्लिम पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देऊन पक्षात न्याय्य प्रतिनिधित्व द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी मांडणारे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव नासेर नजीर खान, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, आणि अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी संयुक्तरित्या निवेदन सादर केले.
हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तसेच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. वजाहत मिर्झा आणि जालना लोकसभेचे खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. कल्याणराव काळे यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, “काँग्रेस पक्ष नेहमी सर्व धर्म, जाती आणि समाजघटकांना समान संधी देण्याचा विचार करतो. त्याच परंपरेत, अल्पसंख्याक बहुल भागात अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना संधी देऊन लोकप्रतिनिधित्व अधिक बळकट करावे.”
👉 अल्पसंख्याक प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर — आता निर्णय काँग्रेस नेतृत्वाच्या कोर्टात!