अल्पसंख्यांक समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याची मागणी – मार्टि कृती समिती महाराष्ट्रचे निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ :- अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलावीत, यासाठी मार्टि कृती समिती महाराष्ट्रतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात, अल्पसंख्यांक समाजासाठी शासनाने राबवलेल्या योजना परिणामकारक पद्धतीने अंमलात याव्यात आणि त्यावर प्रभावी संनियंत्रण यंत्रणा उभी रहावी, यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
1. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक समाजासाठी विशेष मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करावी.
2. ७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिलेल्या अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI) ची तातडीने अंमलबजावणी करावी.
3. मुस्लिम विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षणसुविधा व सवलती उपलब्ध करून द्याव्यात.
4. मुस्लिम समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत किमान ८% आरक्षण देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी.
5. अल्पसंख्यांक युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात.
6. शासनाच्या सर्व योजनांची समान व परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मराठा व ओबीसी समाजासाठी जसे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर अल्पसंख्यांक समाजालाही न्याय मिळणे आवश्यक आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्यास अल्पसंख्यांक समाजामध्ये विश्वास, न्याय आणि समतेची भावना दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
"अल्पसंख्यांक समाजाला न्याय्य हक्क – आता सरकारच्या निर्णयावर नजर!"