अकोल्यात बोगस डॉक्टरवर धाड: रुग्णांच्या जीवाशी चालला होता खेळ!

अकोल्यात बोगस डॉक्टरवर धाड: रुग्णांच्या जीवाशी चालला होता खेळ!

अकोला, २१ जून (प्रतीनीधी) :- अकोला महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने जुने शहरातील हरीहर पेठ परिसरात विना परवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका कथित डॉक्टरवर मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक १८ जून रोजी दुपारी ३ वाजता या ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत रुग्ण तपासणी व भरती सुरू असताना कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेला व्यक्ती आढळून आला.

काय आहे प्रकार?

हरीहर पेठ येथे कथित हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोला महापालिकेचे आरोग्य विभाग, पोलिस विभाग व औषधी निरीक्षक यांनी संयुक्त कारवाई केली. या हॉस्पिटलमध्ये ना डॉक्टराची डिग्री होती, ना हॉस्पिटलची कोणतीही अधिकृत नोंदणी.

धाडीत ८ खाटा (बेड्स) आढळून आल्या, ज्यामध्ये काही रुग्णांना थेट IV सलाईन लावण्यात आले होते. तसेच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा, वैद्यकीय उपकरणे आणि मशीन सापडल्या. विशेष म्हणजे, या ठिकाणी उपचार घेत असलेले रुग्ण गंभीर धोका पत्करत होते.

कोण होती कारवाईची टीम?

ही कारवाई डॉ. आशिष गिहे (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा अकोला), डॉ. अनुप चौधरी, डॉ. विजय चव्हाण, डॉ. प्रभाकर मुदगल यांच्यासह जुने शहर पोलिस स्टेशनचे श्री. अनिल कोरडे यांच्या पथकाने केली. औषधी विभागाचे निरीक्षक श्री माणिकराव व श्री गोतमारे यांनी औषधांचा साठा जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला.

कायदेशीर बाबतीतही मोठा गुन्हा

सदर हॉस्पिटलची मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्ट १९४९ अंतर्गत कोणतीही नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले. रुग्णांची फसवणूक, जीवाशी खेळ आणि कायद्याचे उल्लंघन या सर्व गंभीर बाबींचा समावेश असल्यामुळे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहभागी अधिकारी आणि कायदेशीर सल्ला

या कारवाईत आरोग्य विभागाचे कर्मचारी अंकुश धुड, पंकज गायकवाड, कुलदीप बारबदे, किरण शिरसाठ सहभागी होते. तसेच विधी सल्लागार अॅड. सॉ. शुभांगी ठाकरे (पीसीपीएनडीटी विभाग) यांनी कायदेशीर मार्गदर्शन दिले.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आशिष गिहे यांच्या मार्फत जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.