अंभईत ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तात्काळ दिलासा

अंभईत ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तात्काळ दिलासा

महाराष्ट्र वाणी

अंभई ता. सिल्लोड दि १ मे :- सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे दि. 30 एप्रिल 2026 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान उत्साहात पार पडले. या शिबिराला विविध विभागांचा सक्रिय सहभाग लाभल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात पंचायत, महसूल, कृषी, आरोग्य, अंगणवाडी, भूमी अभिलेख आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

विशेषतः शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित समस्या, पीकविमा, नोंदणी, सातबारा उतारे, तसेच कृषी योजनांबाबतच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. अनेक प्रलंबित प्रकरणे तात्काळ सोडवण्यात आल्याने शेतकरी समाधान व्यक्त करताना दिसून आले.

प्रशासनाच्या या पुढाकारामुळे गावपातळीवरच नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मोठी मदत होत असून, अशा शिबिरांमुळे शासन-जनता यांच्यातील दरी कमी होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

“गावातच प्रश्न सुटले, तरच खऱ्या अर्थाने विकासाची गती वाढते!”