अंभई केंद्रात दिवाळीचा आनंद: पोषण आहार महिलांना साड्या, पुरुषांना ड्रेस वाटप
महाराष्ट्र वाणी न्युज
अंभई (ता. सिल्लोड) दि १६ :- जिल्हा परिषद शाळा केंद्र अंभई येथे काल दिनांक 15 रोजी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदी वातावरणात विशेष उपक्रम राबविण्यात आला. शालेय पोषण आहार महिलांना साड्या तर पुरुषांना ड्रेस वाटप करून त्यांना सणाचा आनंद देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन केंद्र अंभईत करण्यात आले होते. या वेळी गोपाल मुंढे (अध्यक्ष, शालेय समिती मराठी), उस्मान शेख (अध्यक्ष, शालेय समिती उर्दू), शाह मुस्तफा (केंद्रप्रमुख), तसेच ज्येष्ठ शिक्षक संतोष चव्हाण यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
शाळेच्या शेवटच्या दिवशी या उपक्रमामुळे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. दिवाळी सणाचा आनंद अधिक खुलवणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.