२० मेपूर्वी ‘फार्मर आयडी’ काढा; कृषी योजनांसाठी अनिवार्य — कृषी विभागाचे आवाहन
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि ३० :- राज्यातील शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप ‘फार्मर आयडी’ नोंदणी केलेली नसल्यास त्वरित ती पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी शेतकरी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा ‘अॅग्रीस्टॅक’ पोर्टलवरून स्वतःही ऑनलाईन नोंदणी करू शकतात. २० मे २०२६ ही अंतिम मुदत लक्षात घेऊन विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानंतर १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार असून त्यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी पूर्ण केली आहे.
यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ, तसेच बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा मिळवण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आवश्यक राहणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नोंदणीसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विभागनिहाय हेल्पडेस्कशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती विभागासाठी अजितकुमार गेजगे (९६५७१०९८०९), पुणे विभागासाठी संगीता ननावरे (७५८८५०९४९२), कोकण विभागासाठी सोनाली वाडेकर (९४०४९५३५१८), छत्रपती संभाजीनगर विभागासाठी शीतल कौदरे (९१७२३१९६३७), नागपूर विभागासाठी अजितकुमार गेजगे (९६५७१०९८०९) आणि नाशिक विभागासाठी सोनाली वाडेकर (९४०४९५३५१८) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
👉 “फार्मर आयडीशिवाय योजना बंद; २० मेपूर्वी नोंदणी करा, नाहीतर लाभ हुकणार!”