हर्सूल पोलिसांचा धडाका! मोटारसायकल चोरटा जेरबंद; १.६० लाखांच्या चार दुचाकी जप्त

हर्सूल पोलिसांचा धडाका! मोटारसायकल चोरटा जेरबंद; १.६० लाखांच्या चार दुचाकी जप्त
हर्सूल पोलिसांचा धडाका! मोटारसायकल चोरटा जेरबंद; १.६० लाखांच्या चार दुचाकी जप्त

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- शहरातील हर्सूल परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या एका चोरट्याला हर्सूल पोलिसांच्या विशेष पथकाने शिताफीने जेरबंद केले. मोहम्मद नबील उर्फ पेंढा अब्दुल सिराज (वय २७, रा. आसेफिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून तब्बल १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

हर्सूल पोलीस ठाण्यात समीर इसाक मोहयोद्दीन सिध्दीकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक ३२१/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच क्रांती चौक पोलीस ठाण्यातही मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली.

चोरीच्या वाहनांचा आणि आरोपीचा शोध घेत असताना हर्सूल पोलिसांच्या विशेष पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कोलठणवाडी, हर्सूल परिसरात सापळा रचून मोहम्मद नबील उर्फ पेंढा याला ताब्यात घेतले.

आरोपीच्या ताब्यातून सुरुवातीला चोरीची होंडा शाईन मोटारसायकल मिळून आली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. पोलीस कोठडीदरम्यान अधिक चौकशी केली असता आरोपीने बाबा पेट्रोलपंप तसेच हर्सूल गावातून चोरी केलेल्या आणखी दोन दुचाकी सावंगी तलावाच्या भिंतीलगत असलेल्या खोल खड्ड्यात लपवून ठेवल्याची माहिती दिली.

पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी जाऊन आणखी दोन मोटारसायकली जप्त केल्या. तपासादरम्यान या वाहनांबाबत हर्सूल आणि क्रांती चौक पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.

अशाप्रकारे आरोपीकडून MH 20 HF 4564 क्रमांकाची होंडा शाईन आणि MH 20 DM 9445 क्रमांकाची होंडा अ‍ॅक्टिव्हा यांच्यासह एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, सिडको विभाग मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हर्सूल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार, पोलीस उपनिरीक्षक रफीक शेख, सफौ/२३६ सुभाष शेवाळे, पोह/२५०९ ढाकणे, पोअं/२४६६ फिरोज तडवी, पोअं/३२०७ आकाश जायभाये आणि पोअं/१८६१ मोहन सिंगल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हर्सूल पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्याने परिसरातील वाहनचोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.