हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू; जिल्ह्यात ९ खरेदी केंद्रांना मंजुरी, हमीभाव ५८७५ रुपये
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.११ :- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी व खरेदी प्रक्रिया दि. १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे.
या योजनेअंतर्गत हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल ५८७५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष खरेदी १ मार्च ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी NCCF कार्यालयाने ९ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तालुक्यांचा समावेश आहे.
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन नोंदणी करून हमीभावाने खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केले आहे.
— “वेळेत नोंदणी करा आणि हमीभावाचा लाभ घ्या,” असे प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन.