"स्वतःला जुंपून नांगरणी करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यासाठी सोनू सूदचा मदतीचा हात; म्हणाले – 'नंबर पाठवा, बैल पाठवतो'"

"स्वतःला जुंपून नांगरणी करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यासाठी सोनू सूदचा मदतीचा हात; म्हणाले – 'नंबर पाठवा, बैल पाठवतो'"

महाराष्ट्र वाणी न्युज 

लातूर दि ३ जुलै:-    लातूर जिल्ह्यातील एक हृदयद्रावक प्रसंग सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. ७५ वर्षीय अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीचा शेत नांगरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे बैल किंवा यांत्रिक साधने नसल्याने हे वृद्ध दाम्पत्य स्वतः शेतात नांगरणी करताना दिसते. अंबादास पवार स्वतःला औताला जुंपतात आणि त्यांच्या पत्नीने नांगर हाताळण्याची जबाबदारी घेतली आहे.

ही दृश्यं पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या व्हिडीओमुळे त्यांच्या हलाखीची परिस्थिती समोर आली असून, मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

सर्वप्रथम अभिनेता सोनू सूद यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले – "आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।" त्यानंतर त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनही तत्काळ सक्रिय झाले आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी पवार दाम्पत्याच्या शेतावर जाऊन भेट दिली. त्यांनी माहिती दिली की, पवार यांच्याकडे केवळ अडीच एकर कोरडवाहू जमीन असून कोणतीही यंत्रसामग्री उपलब्ध नाही.

कृषी विभागाने तातडीने पुढाकार घेत, सबसिडीवर यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर पुरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, कृषी ओळखपत्रही बनवले जात आहे. अधिकारी बावगे यांनी सांगितले की, लवकरच अंबादास पवार यांना १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान व आवश्यक साधने मिळणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे, पवार दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी प्रकाशझोतात आली आहे. पावसावर अवलंबून असलेली शेती, वाढती उत्पादन खर्च आणि साधनांचा अभाव – या साऱ्या अडचणींमुळे त्यांची परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती.

परंतु आता सामाजिक भावना, कलाकारांची मदत आणि प्रशासनाची तत्परता यामुळे त्यांच्या जीवनात नवा आशेचा किरण दिसू लागला आहे.

हा व्हिडीओ फक्त वेदना सांगत नाही, तर आपल्याला मदतीसाठी पुढे यायचंही आवाहन करतो – "आपणही कोणाचा हात धरू शकतो!"