सेंट्रल नाका परिसरात चौथ्या मजल्यावरील बेडरूमला आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात; सुदैवाने जीवितहानी नाही
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- शहरातील सेंट्रल नाका परिसरातील बारी कॉलनी येथे एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बेडरूमला आग लागल्याची घटना शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीबाबत कॉल प्राप्त झाला. त्यानंतर सिडको, पदमपुरा आणि एन-९ अग्निशमन केंद्रातील पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. चौथ्या मजल्यावरील बेडरूममध्ये आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, उप अग्निशमन केंद्र अधिकारी हरिभाऊ घुगे व हरिचंद्र पवार, ड्युटी अधिकारी चेतन तरोळे व संदीप चव्हाण यांच्यासह अग्निशमन जवान आणि चालकांनी या बचाव व अग्निशमन कार्यात सहभाग घेतला.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण आणि झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
वेळेवर मिळालेला प्रतिसाद आणि अग्निशमन जवानांची तत्परता यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित