सुलेमान हत्या प्रकरण : मुख्य आरोपी अजूनही मोकाट; पोलिसांवर राजकीय दबावाचा आरोप – SDPIचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव दि २२ :- जामनेर तालुक्यातील बेटावद येथे मोब लिंचिंगमध्ये निर्दोष सुलैमान खान पठाण यांचा मृत्यू होऊन दहा दिवस उलटून गेले. मात्र अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. हे आरोपी एका प्रभावशाली राजकीय नेत्याचे निकटवर्तीय असल्याने पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) ने केला. याविरोधात SDPI व एकता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची शिष्टमंडळासोबत तब्बल ३५ मिनिटे सविस्तर चर्चा झाली. “ही घटना महाराष्ट्रापुरती नव्हे तर भारतासाठीही कलंकासमान आहे. प्रशासन कायद्याने आवश्यक ती कारवाई करेल,” असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
SDPIच्या मुख्य मागण्या
१) सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करावी.
२) तपास अधिकारी मधुकर कासार यांना SITमधून काढून टाकावे.
३) फिर्यादी व कुटुंबीयांच्या जबाबावर आधारित त्वरित कारवाई व्हावी.
४) आरोपींवर मकोका व संगनमताचे कठोर कलम लावावे.
५) जलदगती न्यायालयात खटला चालवावा.
६) मृत सुलैमान खान पठाण यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व पुनर्वसन द्यावे.
७) अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यात ठोस उपाययोजना कराव्यात.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की, दोषींना तातडीने अटक न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल.
या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाच्या भावना ऐकून घेतल्या व कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. आंदोलनात SDPIचे अध्यक्ष मौलाना मतीन देशपांडे, उपाध्यक्ष मौलाना कासिम नदवी, फारुक शेख, अशपाक पटेल, जावेद मुल्लाजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📸 फोटो कॅप्शन :
१) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा करताना शिष्टमंडळ.
२) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना SDPIचे अध्यक्ष मौलाना मतीन देशपांडे, उपाध्यक्ष मौलाना कासिम नदवी व अन्य पदाधिकारी.