सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न: काँग्रेसकडून 'जोडे मारो' आंदोलन करून तीव्र निषेध
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ७ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार, छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई सर यांच्यावर एका सनातनी विचारसरणीच्या वकिलाने बूट फेकून मारण्याचा केलेल्या प्रयत्नाचा तीव्र निषेध नोंदवला. या निषेधार्थ शहरात ‘जोडे मारो’ आंदोलन राबवण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी आरोपी वकील राकेश किशोर यांच्या प्रतिमेला जोडे मारून, त्यानंतर ती प्रतिमा जाळून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ यांनी केले.
यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि संताप दिसून आला.
कार्यक्रमाला विविध काँग्रेस पदाधिकारी, शहर व जिल्हा कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे सदस्य, महिला काँग्रेस, NSUI आणि इतर घटक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने या घटनेचा निषेध करत स्पष्ट केले की, लोकशाहीच्या सर्वोच्च न्यायसंस्थेवर असा हल्ला म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर आघात असून, तो देशद्रोहासमान आहे. तसेच अशा वृत्तीचा जोरदारपणे विरोध केला जाईल, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने दिला आहे.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
राकेश किशोर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त.
संविधान व न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी आंदोलन.
काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती.
काँग्रेस पक्षाकडून यापुढेही अशा घटना रोखण्यासाठी जनजागृती व कायदेशीर मागण्यांसाठी आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.