सिल्लोड-सोयगावमधील वीज समस्यांवर आमदार अब्दुल सत्तार यांची आढावा बैठक; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी वीज वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. छत्रपती संभाजीनगर येथील वीज वितरण विभागाच्या परिमंडळ कार्यालयात झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासह नवीन विकासकामांच्या प्रस्तावांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जीर्ण झालेले विद्युत खांब आणि तारा बदलणे, शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार विद्युत रोहित्र (डीपी) वेळेत उपलब्ध करून देणे, तसेच प्रलंबित वीजविषयक कामांना गती देण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नवीन कामांचे प्रस्तावही परिपूर्ण स्वरूपात सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील वॉटर ग्रीड योजनेची कामे तातडीने कार्यान्वित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेला आवश्यक असलेल्या ठिकाणी वीज वितरण विभागाने प्राधान्याने कामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, मतदारसंघातील संपादित तलावांच्या क्षेत्रात तसेच तलावालगत सुरू असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. याशिवाय शेतकरी, नागरिक आणि शहरातील वीज ग्राहकांच्या विविध अडचणींचा आढावा घेऊन त्यांचे निराकरण प्राधान्याने करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
वीजविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन विविध विषयांवर निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या बैठकीला वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुंठेकर, अधीक्षक अभियंता विनय घनबहादूर, अधीक्षक अभियंता बिना सावंत, सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाढे, सय्यद नासेर हुसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, अशोक सूर्यवंशी, विनोद मंडलेचा, गणेश पाटील, लक्ष्मण जगताप आदींसह सिल्लोडचे कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, उपकार्यकारी अभियंता प्रदीप काळे, शहर अभियंता धम्मपाल म्हस्के, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दिकी तसेच विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित