सिल्लोड–भोकरदनमध्ये ‘सत्तार पॅटर्न’! दानवेंचा बालेकिल्ला ढासळला; अब्दुल सत्तारांचा थेट हल्ला –“स्वतःची खुर्ची सांभाळू शकले नाहीत, सिल्लोड काय जिंकणार?”

सिल्लोड–भोकरदनमध्ये ‘सत्तार पॅटर्न’! दानवेंचा बालेकिल्ला ढासळला; अब्दुल सत्तारांचा थेट हल्ला –“स्वतःची खुर्ची सांभाळू शकले नाहीत, सिल्लोड काय जिंकणार?”
सिल्लोड–भोकरदनमध्ये ‘सत्तार पॅटर्न’! दानवेंचा बालेकिल्ला ढासळला; अब्दुल सत्तारांचा थेट हल्ला –“स्वतःची खुर्ची सांभाळू शकले नाहीत, सिल्लोड काय जिंकणार?”

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड दि. २२ :- महाराष्ट्रातील २८८ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहिले आहे. महायुतीने एकूणच आघाडी घेतली असली, तरी सिल्लोड–भोकरदन पट्ट्यातील हायव्होल्टेज संघर्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघर्षात मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना थेट राजकीय धक्का दिल्याचे चित्र आहे.

🏰 सिल्लोड – सत्तारांचा अभेद्य गड

सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर सत्तार यांनी तब्बल २३,५०० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला. एवढेच नव्हे, तर सत्तार समर्थित पॅनलने नगरसेवक पदांवरही वर्चस्व प्रस्थापित करत सिल्लोड हा आपलाच राजकीय बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध केले.

💥 “भोकरदनमध्येच हिशोब चुकता केला”

विजयानंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले,

“सिल्लोडमध्ये येऊन आमचं काही बिघडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे. आम्ही त्यांच्या भोकरदन आणि फुलंब्रीत घुसून त्यांचं गणित चुकतं केलंय. ज्यांना स्वतःची खुर्ची वाचवता आली नाही, ते सिल्लोड काय बघणार?”

भोकरदन हा रावसाहेब दानवे यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. तसेच कन्नड मतदारसंघातून त्यांची कन्या आमदार असतानाही या भागात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने सत्तारांच्या वक्तव्याला अधिक धार आली आहे.

🔥 जुना संघर्ष, नव्या निकालातून उत्तर

सत्तार–दानवे यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात दानवे यांच्या पराभवामागे सत्तारांची भूमिका असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर दानवेंनी सिल्लोडबाबत गंभीर आरोप केले होते.

मात्र, नगरपालिका निवडणुकीतील निकालांनीच त्या आरोपांना उत्तर दिले, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.