सिंचन सुविधासाठी गाळ काढण्याबरोबरच केटी वेअर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येईल- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
कालवा सल्लागार समिती बैठक डाव्या आणि उजव्या कालव्यातून प्रत्येकी चार आवर्तनास मान्यता
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :- जायकवाडी धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेती साठी समान चार आवर्तन, पिण्यासाठी राखीव पाणी तरतूद केली आहे,तसेच जायकवाडी धरणातील गाळ काढून केटीवेअर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.
पैठण, संतपीठ मध्ये कालवा सल्लागार समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते,आमदार विजयसिंह पंडित, राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश बोरणारे हिकमत उढाण, विलास भुमरे दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री मेघना बोर्डीकर,आमदार नारायण कुचे, प्रकाश दादा सोळंके हे उपस्थित होते.जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी,गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे , निम्न दुधना प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप,यांच्यासह बीड ,परभणी जालना जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सिंचनासाठी जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यामधून ज्याप्रमाणे चार आवर्तन दिले जातात त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातून देखील चार आवर्तन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली. तसेच नांदूर मधमेश्वर कालव्यात उन्हाळी ४ आवर्तनासाठी आणि निम्न दुधना प्रकल्प मधून चार आवर्तन देण्यासाठी मान्यता देण्यात आली.
भविष्यातील सिंचन सुविधांच्या उपायोजनेसाठी केटी वेअर बंधाऱ्याचे बॅरेज मध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून जायकवाडी धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय राज्य स्तरावर घेण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
नांदूर मधमेश्वर कालव्याचे शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात राखीव असून ,पाण्याचे आवर्तन वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावेतअशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी केली. बीड, परभणी ,जालना, संभाजीनगर येथील विविध मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या पाणी वाटपाच्या संदर्भात आणि बंधाऱ्याची दुरुस्ती आणि त्याचे बॅरेज मध्ये रूपांतर करण्याबाबतच्या मागणीस बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली . पुढील वर्षात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबतही जलसंधारण विभागाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिले.