सकाळी दुकानाचे उद्घाटन, सायंकाळी ₹१० हजारांचा दंड! देवळाई चौकातील 'माधव सोलर एनर्जी'वर मनपाची कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- महानगरपालिकेने स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली असून, उद्घाटन समारंभानंतर सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी देवळाई चौकातील 'माधव सोलर एनर्जी' या नव्याने सुरू झालेल्या दुकानावर ₹१० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रविवार (दि. १९ जुलै २०२६) रोजी सातारा-देवळाई चौक परिसरातील 'माधव सोलर एनर्जी' या दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमासाठी पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते तसेच चहा-नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर वापरलेल्या प्लेट्स, कप व इतर कचरा दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर टाकण्यात आल्याचे आढळून आले.
दरम्यान, सातारा परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पथक नियमित स्वच्छता पाहणी करत असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोबे यांच्या आदेशानुसार संबंधित दुकानावर ₹१० हजारांचा दंड आकारण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, शहर विद्रुप करणाऱ्या आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेची कठोर मोहीम सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात येतील.
त्यांनी नागरिक व व्यावसायिकांना ओला, सुका व इतर कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो निर्धारित ठिकाणीच टाकण्याचे आवाहन केले. तसेच सांस्कृतिक, सामाजिक, खासगी किंवा कौटुंबिक कार्यक्रम 'झिरो वेस्ट इव्हेंट' संकल्पनेनुसार किंवा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छता नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आयुक्तांनी म्हटले.
या कारवाईवेळी स्वच्छता निरीक्षक उमेश खरात, जवान विनोद कदम तसेच नागरिक मित्र पथकाचे गौतम वानखेडे, संतोष नवगिरे आणि रावसाहेब इधाटे उपस्थित होते.