शहरात इंधनटंचाईची अफवा; पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची झुंबड
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ३ :- आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या Iran–Israel conflict आणि त्यामध्ये United Statesच्या सहभागाच्या चर्चेमुळे शहरात इंधनटंचाईबाबत अफवा पसरली आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार आणि पेट्रोल पंप लवकरच बंद पडणार, अशा संदेशांचा सोशल मीडियावर वेगाने प्रसार झाला.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत पंपांवर थांबण्याचा पर्याय निवडला.
काही वाहनधारकांशी संपर्क साधला असता, “पेट्रोल पंप बंद होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे खबरदारी म्हणून इंधन भरून घेत आहोत,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, वाढत्या मागणीमुळे शहरातील काही पेट्रोल पंपांवर तात्पुरता साठा संपल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, पेट्रोल पंप असोसिएशन किंवा जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे इंधनटंचाईबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे. तरीही अफवांमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनत असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.
👉 अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या — अन्यथा अनावश्यक गर्दीचाच फटका सर्वसामान्यांना बसेल!