व्यंकटेशनगर गार्डनजवळ अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाची धडक कारवाई; ५ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त, दोघांविरुद्ध NDPS अंतर्गत गुन्हा
सेव्हन हिल परिसरात एमडी पावडरचा पर्दाफाश! २२ वर्षीय तरुणाच्या ताब्यातून ड्रग्ज, मोबाइल आणि दुचाकी जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- शहरातील अंमलीपदार्थ विक्रीविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत सेव्हन हिल परिसरातील व्यंकटेशनगर गार्डनजवळून एका २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून ५ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम एमडी पावडर (मेफेड्रॉन), मोबाइल हँडसेट आणि मोटारसायकल असा एकूण ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजता करण्यात आली. अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार व्यंकटेशनगर गार्डनजवळ, सेव्हन हिल, एमजीएम रोड परिसरात सापळा रचण्यात आला.
या कारवाईत सोहेल अल्ताफ कुरेशी (वय २२) याच्या ताब्यातून एमडी पावडर जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने हा अंमलीपदार्थ चिलकठाणा परिसरातील एका व्यक्तीकडून आणल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी संबंधित दोन्ही व्यक्तींविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमलीपदार्थ पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांच्यासह अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
दरम्यान, शहरात कोठेही अंमलीपदार्थांची विक्री, सेवन किंवा नशाखोरीसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती नागरिकांनी ९६८४७०२००२ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.