विलास पारकरांच्या भेटीनंतरही अब्दुल सत्तार भूमिकेवर ठाम; पदवीधर निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिंदेसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी सत्तार यांची भेट घेतली. मात्र, या चर्चेनंतरही सत्तार यांनी आपली भूमिका बदललेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात आपणही भूमिका घेणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. तसेच, शिवसैनिकांनी संबंधित उमेदवाराची पार्श्वभूमी आणि भूमिका समजून घेऊन मतदान व प्रचाराबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सत्तार यांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विलास पारकर यांच्या भेटीनंतरही भूमिका कायम राहिल्याने शिंदेसेना आणि सत्तार यांच्यातील पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित