विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची CSMRDA मधील कंत्राटी पदभरतीला मंजुरी; पुढील आठवड्यात प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १६ :- महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMRDA) अंतर्गत येणाऱ्या गावांचा व झालर क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्त तथा CSMRDA चे आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंजुरी दिली आहे. तसेच पुढील आठवड्यापासून भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
CSMRDA कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सहआयुक्त अंजली धानोरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपआयुक्त (प्रशासन) लखीचंद चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्राधिकरण क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण आणि विविध पायाभूत विकास प्रकल्प लक्षात घेता सक्षम मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबतच अतिरिक्त कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ही भरती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या धर्तीवर राबविण्यात येणार असून विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
बैठकीत CSMRDA मधील नियमित पदभरतीचाही आढावा घेण्यात आला. वर्ग-१ ते वर्ग-४ अशा एकूण १४७ पदांसाठी सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली असून, शासनाच्या नियमानुसार नियमित भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्ती, बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याची कार्यपद्धती, शैक्षणिक पात्रता, अटी-शर्ती तसेच संबंधित एजन्सीच्या निवडीबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढल्यानंतर CSMRDA क्षेत्रातील विकासकामांना अधिक गती मिळेल आणि नागरिकांना आधुनिक, दर्जेदार व नियोजनबद्ध नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र वाणी – विश्वसनीय, वेगवान आणि वस्तुनिष्ठ बातम्या.