वक्फ मालमत्तांवरही ‘बुलडोझर’; एनओसी असलेल्यांनाच मिळणार दिलासा, अन्यथा थेट कारवाई!

वक्फ मालमत्तांवर कारवाई टाळायची असल्यास मालमत्ताधारकांकडे वक्फ बोर्डाची एनओसी असणे आवश्यक आहे.

वक्फ मालमत्तांवरही ‘बुलडोझर’; एनओसी असलेल्यांनाच मिळणार दिलासा, अन्यथा थेट कारवाई!
वक्फ मालमत्तांवरही ‘बुलडोझर’; एनओसी असलेल्यांनाच मिळणार दिलासा, अन्यथा थेट कारवाई!

छत्रपती संभाजीनगर, दि. १४ (महाराष्ट्र वाणी):

शहरातील डिपी रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची महापालिकेची मोहीम न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, त्यात धार्मिक स्थळे आणि वक्फ मालमत्तांचाही समावेश आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले की, वक्फ मालमत्तांवर कारवाई टाळायची असल्यास मालमत्ताधारकांकडे वक्फ बोर्डाची एनओसी असणे आवश्यक आहे.

रहिवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली असून, वक्फ मालमत्तांबाबत अधिक माहिती विचारली असता, आयुक्तांनी सांगितले की, वक्फ बोर्डाच्या नियमांनुसार लिज आणि एनओसी असलेल्या मालमत्तांची गुंठेवारी केली जाईल. मात्र, बांधकाम परवानगी नसलेल्या आणि अनधिकृत मालमत्तांवर कारवाई अटळ आहे.

भाडेकरूंनी ‘2014 कायदा’ न पाळल्यास वाचणार नाही मालमत्ता!

वक्फ मालमत्तांबाबत AIUDF चे प्रदेशाध्यक्ष शेख सईद यांनी वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांची भेट घेऊन शहरातील अतिक्रमण कारवाईत वक्फ मालमत्तांचा समावेश होत असल्याने काय निर्णय घेण्यात येणार आहे, याबाबत चर्चा केली.

यावर बोलताना समीर काझी यांनी स्पष्ट केले की, मस्जिद, दर्गा, कब्रस्तान यांसारख्या वक्फ संस्थांना एनओसी दिली जाईल. मात्र, ज्यांनी 2014 च्या नव्या कायद्यानुसार भाडे करारनामा केला नसेल, किंवा शंभर, दोनशे, पाचशे रुपये इतके जुने भाडे देत असतील, तसेच नवीन वीज कनेक्शन घेतले नसेल, अशा अनधिकृत भाडेकरूंना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

मोबदला वक्फ बोर्डाला, भाडेकरूंना नाही!

महापालिकेने स्पष्ट केले की, वक्फ बोर्डाची मालमत्ता असली तरी ती अनधिकृत असेल, तर ती पाडली जाईल. अशा वेळी मोबदला थेट वक्फ बोर्डालाच दिला जाईल, भाडेकरूंना नव्हे.

शहरात सध्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा जोर सुरू आहे. त्यामुळे वक्फ मालमत्ता असो वा इतर – अधिकृत दस्तऐवज, एनओसी आणि कायदेशीर करारनामा नसलेल्या कोणत्याही मालमत्तेला दिलासा मिळणे कठीण आहे.

 मालमत्ता वाचवायची असेल तर कायदेशीर कागदपत्रे सज्ज ठेवा; अन्यथा मनपा 'बुलडोझर'पासून कोणीही वाचणार नाही!