वंजारी समाजाच्या योगिता नागरगोजे यांची पिंपरी-चिंचवड मनपावर दुसऱ्यांदा निवड; जनतेने कामावर उमटवला विश्वासाचा शिक्का
महाराष्ट्र वाणी
पुणे ( प्रतिनिधी) दि २० :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वंजारी समाजातील योगिता नागरगोजे यांनी दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. गेल्या चार–पाच वर्षांतील सातत्यपूर्ण, जनाभिमुख व जमिनीवर दिसणाऱ्या कार्याची ही पोचपावती असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी, संवेदनशीलता आणि थेट संवाद या त्रिसूत्रीवर आधारित कामकाज करत योगिता नागरगोजे यांनी प्रभागातील नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासाच्या बळावर मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
या यशस्वी पुनर्निवडीच्या पार्श्वभूमीवर वंजारी महासंघ महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. सुवर्णा कराड यांनी योगिता नागरगोजे यांच्या निवासस्थानी भेट देत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी नागरगोजे यांनी केलेल्या सामाजिक तसेच नागरी विकासात्मक कार्याचे विशेष कौतुक केले.
अभिनंदनपर भाष्यात डॉ. सुवर्णा कराड म्हणाल्या, “संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे ही योगिता नागरगोजे यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.”
कोरोना महामारीच्या काळातील मदतकार्य, नागरिकांशी थेट संवाद, तसेच रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा — यामुळे त्यांच्या कामाची ठसठशीत ओळख निर्माण झाली आहे. प्रसिद्धीपेक्षा कामाला प्राधान्य देणारी ही भूमिका मतदारांच्या दैनंदिन जीवनात परिणामकारक ठरली आहे.
दुसऱ्यांदा मिळालेल्या जनादेशामुळे अपेक्षा वाढल्या असल्या तरी, आतापर्यंतच्या वाटचालीवरून पुढील कार्यकाळातही विकासाभिमुख, समन्वयात्मक आणि नागरिककेंद्रित कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.