राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर तालुकाध्यक्षांचा सवाल; “कार्यकर्त्यांचा अंत पाहू नका, नेतृत्वाने मौन सोडावे!”

सत्तेत सहभागी होणार की स्वतंत्र राजकीय वाटचाल करणार? पक्षाच्या भवितव्याबाबत वरिष्ठ नेतृत्वाने अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची प्रा राहुलकुमार ताठे यांची मागणी

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर तालुकाध्यक्षांचा सवाल; “कार्यकर्त्यांचा अंत पाहू नका, नेतृत्वाने मौन सोडावे!”

सिल्लोड दि २५ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना तसेच सत्तेत सहभागी होण्याच्या शक्यतांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेग आला आहे. समाजमाध्यमांवर यासंदर्भात विविध दावे, बातम्या आणि तर्कवितर्क मांडले जात असताना पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष प्रा राहुलकुमार ताठे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला स्पष्ट शब्दांत भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे.

“विलीनीकरणाच्या आणि सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांनी कार्यकर्त्यांचा अंत पाहू नका!” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

ताठे यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत, सत्तेत सहभागी होण्याबाबत आणि पक्षाच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांमध्ये नेमके किती तथ्य आहे आणि किती केवळ राजकीय अंदाज किंवा अफवा आहेत, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत आहे.

पक्षासाठी प्रतिकूल परिस्थितीतही झेंडा खांद्यावर घेऊन गावोगावी संघटन उभे करणारे, संघर्ष करणारे आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणारे निष्ठावान कार्यकर्ते आज नेमकी कोणती भूमिका घ्यावी, या प्रश्नात अडकले आहेत. पक्षासाठी काम सुरू ठेवायचे की आगामी राजकीय निर्णयाची वाट पाहायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला असल्याचे ताठे यांनी नमूद केले.

नेतृत्वाने निर्णय घेताना कार्यकर्त्यांचा विचार करावा!

राजकारणात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या नेतृत्वाचा असला, तरी त्या निर्णयांचे परिणाम तळागाळातील कार्यकर्त्यांना भोगावे लागतात. पक्षाचे अस्तित्व गावागावांत टिकवून ठेवण्याचे काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे त्यांना विश्वासात न घेता राजकीय निर्णय घेतल्यास संघटनात्मक पातळीवर संभ्रम निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना केवळ सत्तेची स्वप्ने दाखवण्याऐवजी पक्षाच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका जाणून घेण्याचा अधिकार आहे. विलीनीकरणाचा विचार सुरू आहे की नाही? सत्तेत सहभागी होण्याबाबत अधिकृत चर्चा सुरू आहे का? पक्षाची आगामी राजकीय दिशा नेमकी काय असणार आहे? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे वरिष्ठ नेतृत्वाने जाहीरपणे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

अफवा असतील तर फेटाळा, चर्चा सुरू असेल तर कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या!

जर विलीनीकरण किंवा सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा निराधार असतील, तर वरिष्ठ नेतृत्वाने त्या स्पष्टपणे फेटाळून लावाव्यात. मात्र यासंदर्भात काही राजकीय प्रक्रिया सुरू असेल, तर त्याची माहिती कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन द्यावी, असे ताठे यांनी म्हटले आहे.

पक्ष केवळ नेत्यांच्या राजकीय निर्णयांवर मोठा होत नाही, तर निष्ठावान कार्यकर्त्यांचा त्याग, संघर्ष आणि विश्वास यावर उभा असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून संघटनात्मक ताकद टिकवणे शक्य नाही. कार्यकर्ता हा केवळ निवडणुकीपुरता वापरण्याचा घटक नसून पक्षाचा खरा आधारस्तंभ आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

आता वरिष्ठ नेतृत्व मौन सोडणार का आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणार का, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित