राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचं मदतीचं पॅकेज जाहीर!

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचं मदतीचं पॅकेज जाहीर!

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ७ :- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती आणि घरे यांचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

🧑‍🌾 शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात एकूण १ कोटी ४३ लाख हेक्टर जमिनीवर शेती लागवड झाली होती. यापैकी सुमारे ६८ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्यामुळे रब्बी हंगामाची लागवडही शक्य नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारने मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे.

🏡 घरे, जनावरे, आणि पायाभूत सुविधा – सर्वसमावेशक मदत

राज्यातील २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांतील शेतकरी या योजनेतून लाभार्थी ठरणार आहेत. केवळ शेतीच नव्हे, तर घरांचं नुकसान, गोठे, दुकाने, विहिरी, जनावरे आणि पायाभूत सुविधांचंही नुकसान भरपाईत समाविष्ट आहे.

💸 मुख्य मदतीचे मुद्दे खालीलप्रमाणे:

1. ६५ मिलिमीटर पावसाची अट रद्द – कोणतीही मर्यादा न ठेवता नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत.

2. प्रत्येकी १० हजार रुपये तत्काळ मदत – घरांचं संपूर्ण नुकसान झाल्यास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घर.

3. दुधाळ जनावरांसाठी – प्रत्येकी ३७,५०० रुपये मदत.

4. ओढकाम जनावरांसाठी – प्रत्येकी ३२,००० रुपये.

5. कोंबड्यांसाठी – प्रत्येकी १०० रुपये.

6. शेती जमीन खरडून गेल्यास – ४७,००० रुपये हेक्टरी रोख, आणि ३ लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून.

7. बाधित विहिरींसाठी – ३०,००० रुपये प्रति विहीर.

8. दुकानांचे नुकसान – ५०,००० रुपये पर्यंत मदत.

9. रबी पिकांसाठी अतिरिक्त मदत – १०,००० रुपये हेक्टरी.

10. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी – १८,५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतीसाठी २७,००० रुपये, तर बागायतीसाठी ३२,५०० रुपये हेक्टरी.

11. पायाभूत सुविधांसाठी – स्वतंत्रपणे १०,००० कोटींची तरतूद.

12. एनडीआरएफच्या जनावरांच्या मर्यादा शिथिल – ३ जनावरांची मर्यादा हटवली.

13. विमा लाभ – ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवण्यात आला असून, पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७,००० रुपये हेक्टरी विमा लाभ मिळणार.

14. दुष्काळ उपाय योजनांचाही समावेश – जमीन महसूल सवलत, कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफी यांचा समावेश.

🗣️ सरकारचा निर्धार: “शेतकरी पुन्हा उभा राहणार”

फडणवीस म्हणाले, “शेतकरी संकटात असला, तरी आम्ही त्याला एकटं सोडणार नाही. सरकारकडून प्रत्येक प्रकारे मदत करण्यात येणार आहे. हे फक्त पॅकेज नाही, तर शेतकऱ्यांना पुन्हा सक्षम करण्याचा निर्धार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे होरपळून निघालेल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ही मदत योजना प्रभावीपणे राबवली जाणार असून, प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाचा यात समावेश होईल, असा सरकारचा दावा आहे.

 सदर निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या नव्या सुरुवातीला हातभार लागेल, अशी आशा राज्यभरातून व्यक्त होत आहे.