रत्नागिरीच्या मजगावची कन्या डॉ. अमीना इब्जी बनल्या कुटुंबातील पहिल्या महिला डॉक्टर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- रत्नागिरी जिल्ह्यातील मजगाव येथील डॉ. अमीना अब्दुल मजीद इब्जी यांनी एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या संपादन करत इब्जी कुटुंबातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मजगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. अमीना यांनी मुंबईतील एमजीएम मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अब्दुल्ला इब्जी हे एमडी असून सध्या डीएमचे उच्च शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील कुटुंबाची ही यशस्वी परंपरा पुढे नेत डॉ. अमीना यांनीही आपल्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण केली आहे.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील आणि आत्यांना दिले असून, ही पदवी त्यांनी आपल्या स्वर्गीय आजी-आजोबांच्या पवित्र स्मृतीस समर्पित केली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त मजगाव येथे ग्रामस्थ, नातेवाईक तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. अमीना इब्जी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.
ग्रामीण भागातील मुलींनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी डॉ. अमीना इब्जी यांचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे