यशदाच्या ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला भेट; प्रशासनाच्या कामकाजाची घेतली माहिती

यशदाच्या ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला भेट; प्रशासनाच्या कामकाजाची घेतली माहिती
यशदाच्या ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला भेट; प्रशासनाच्या कामकाजाची घेतली माहिती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्या वतीने आयोजित एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (CPTP-12) अंतर्गत ३३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच आदर्श ग्रामपंचायत पाटोदा येथे भेट देऊन ग्रामीण विकासाच्या उपक्रमांची पाहणी केली.

यशदाचे सत्र आयोजक तथा राज्य ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प उपसंचालक श्री. राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) श्री. राघवेंद्र घोरपडे यांनी जिल्हा परिषदेची प्रशासकीय रचना, विविध विभागांचे कामकाज आणि जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या आर्थिक व लेखाविषयक कामकाजाबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. शिवप्रसाद जटाळे यांनी प्रशिक्षणार्थींना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तर शिक्षणाधिकारी श्री. संघरत्न सरोदे यांनी आपल्या प्रशिक्षण काळातील अनुभव सांगत प्रशासकीय पदावरील जबाबदाऱ्या आणि कामकाजाच्या स्वरूपावर प्रकाश टाकला.

यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती श्री. सचिन गरड यांनी मार्गदर्शन करताना, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय राखून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वासुदेव सोळंके यांनी प्रशासकीय पदावर कार्यरत असताना कामाचे स्वरूप, संकल्पना आणि लोकाभिमुख प्रशासन यांची योग्य सांगड घालून काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचा सल्ला दिला. प्रशासकीय पद, अधिकार आणि प्रतिष्ठा यांचा कधीही गर्व न बाळगता अहंकारापासून दूर राहून जनतेला निकोप व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हेच प्रत्येक अधिकाऱ्याचे ध्येय असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. अविनाश पाटील गलांडे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना भावी प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असून, पर्यटनासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या कामांचाही प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. भविष्यात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने यशदाचे प्रकल्प उपसंचालक श्री. राजेंद्र अहिरे यांचे उमेद अभियानामार्फत तयार करण्यात आलेली भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र अहिरे यांनी केले. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रत्यक्ष कामकाज, ग्रामीण विकासाच्या योजना आणि लोकाभिमुख प्रशासनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित