मोठा निर्णय! प्लास्टिक-फायबर कपात चहा दिल्यास थेट कारवाई; हॉटेल बंद होण्याचीही शक्यता

मोठा निर्णय! प्लास्टिक-फायबर कपात चहा दिल्यास थेट कारवाई; हॉटेल बंद होण्याचीही शक्यता

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि २७ :- राज्यातील चहाप्रेमी आणि हॉटेल व्यवसायिकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत अनेक चहाच्या टपऱ्या आणि हॉटेलांमध्ये आजही गरम चहा प्लास्टिक किंवा फायबरच्या ‘यूज अँड थ्रो’ कपांमध्ये दिला जातो. मात्र अशा कपांच्या वापरामुळे आरोग्याशी संबंधित काही गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याने प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, अतिउष्ण पदार्थ किंवा पेय प्लास्टिक अथवा फायबरच्या कपांमध्ये दिल्यास त्यातील काही रासायनिक घटक पेयात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीर्घकाळ अशा पदार्थांचे सेवन आरोग्यावर परिणाम करू शकते, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) प्लास्टिक आणि फायबरच्या कपांमधून चहा देण्यावर निर्बंध घालण्यासंदर्भात निर्णयाची चर्चा सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, टपऱ्या आणि व्यावसायिक आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये आस्थापना बंद करण्याचाही इशारा दिला जात असल्याची माहिती आहे.

ग्राहकांना यापुढे काचेचे ग्लास, स्टेनलेस स्टीलची भांडी किंवा मातीच्या कुल्हडचा वापर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे.

हा निर्णय सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, कारण दररोज लाखो नागरिक रस्त्यावरील चहाच्या टपऱ्यांवर चहा घेतात आणि मोठ्या प्रमाणात डिस्पोजेबल कपांचा वापर केला जातो.

आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेले हे पाऊल कितपत प्रभावी ठरेल? याबाबत नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ — तुमच्या आसपासच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींसाठी!