“माझी प्रतिमा मलीन करण्याचा डाव; पण मी देशासाठीच उभा” – रशीद खान मामूंचा भाजपावर घणाघात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २७ :
छत्रपती संभाजीनगर महापालिका व राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माझ्या नावाचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठीच माझ्याविरोधात खोटा व जातीय स्वरूपाचा अपप्रचार केला जात आहे, असा गंभीर आरोप उबाठा गटाचे नेते रशीद खान मामू यांनी केला. “मी सर्वप्रथम हिंदुस्थानी आहे. माझ्यावर लावले जाणारे आरोप सिद्ध करून दाखवा,” असे खुले आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
पाकिस्तान समर्थन, वंदेमातरमला विरोध, तसेच १९८८ च्या दंगलीतील सहभागाबाबत केले जाणारे आरोप पूर्णतः निराधार असल्याचे सांगत मामू म्हणाले, “असे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. सोशल मीडियावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात मी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.”
उबाठामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही हिंदू समाजातील व्यक्तीने माझ्या भूमिकेला विरोध केलेला नाही, हे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “मी लहान वयापासून राजकारणात सक्रिय आहे. उद्धव ठाकरे हे खरे हिंदुत्ववादी नेते असून ते सर्व घटकांना सोबत घेऊन चालतात. त्यामुळेच धर्मनिरपेक्ष विचारधारेचे लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत.”
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेल्या वादावर भाष्य करताना मामू म्हणाले, “तो गैरसमज होता. आम्ही दोघेही एका पक्षातील आहोत. बसून चर्चा करून नाराजी दूर केली जाईल. यावरून विरोधकांनी राजकीय पोळी भाजू नये.”
आपल्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मराठवाडा आंदोलनातूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला. महापौर असताना बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या कामाचे कौतुक केले होते. त्या काळात अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला सहकार्य लाभले. विविध सामाजिक व धार्मिक घटनांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल शासनाकडून सन्मानही मिळाला आहे.
१९८८ च्या दंगलीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत मामू म्हणाले, “त्या काळात मी दंगलीत अडकलेल्या अनेक हिंदू नागरिकांचे प्राण वाचवले. लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. माझ्यावर आरोप करणे सोपे आहे, पण सत्य बदलता येत नाही.”
एमआयएम तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून प्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या, मात्र मी उबाठामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. “उमेदवारी मिळो वा न मिळो, मी उबाठातच राहणार. हा पक्षप्रवेश आहे, धर्मांतर नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
सर्व जाती-धर्मांचा सन्मान राखत समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच माझी ओळख असल्याचे सांगत रशीद खान मामू यांनी विरोधकांच्या आरोपांना ठामपणे उत्तर दिले.