महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून अश्लील चॅट करणारा आरोपी जेरबंद! ग्रामीण सायबर पोलीसांची धडक कारवाई!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ :- महिलांच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून इतर महिलांना अश्लील चॅट करणाऱ्या एका इसमाला ग्रामीण सायबर पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर केवळ काही दिवसांत आरोपीचा शोध लावण्यात पोलीसांना यश आले.
▪️महिलेच्या फोटोचा गैरवापर करून बनावट खाते
दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीने तिचे फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले व इतर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तक्रारदार असल्याचे भासवत अश्लील संभाषण करत होता. या ऑनलाइन बदनामीला कंटाळून तिने पोलिसांत धाव घेतली.
▪️तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा पर्दाफाश
सायबर पोलीसांनी केलेल्या तांत्रिक तपासात आरोपीचे नाव जलील शहा खलील इनामदार (रा. भऊर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असल्याचे समोर आले. त्याने स्वतःच्या बहीणीच्या मोबाईलवरील ओटीपी वापरून आपल्या मोबाईलमधून बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केल्याची कबुली दिली. आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यावर महिलेच्या नावाने तयार केलेले खातेही आढळले.
▪️पोलिसांचा संयुक्त तपास – मोठे यश
मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजयसिंग जोनवाल, सफौ कैलास कामठे, दत्ता तरटे, सविता जायभाये, मुकेश वाघ, योगेश तरमळे, राजेश राठोड आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली.
▪️सायबर पोलिसांची सूचना
अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही ऑनलाइन फसवणूक वाटल्यास तत्काळ सायबर पोलीसांना कळवा.